Wednesday, February 8, 2023

महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल; राऊतांचे मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था वरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांच्यावर पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, सुधीर भाऊ फार संवेदनशील आहेत. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटेल. रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळवून नेले पण सन्मानाने अशोकवनात ठेवलं. या भूमीची परंपरा आहे इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा नाश करतो असे संजय राऊत यांनी म्हंटल.

- Advertisement -

महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान राखला गेलेला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत आपण कठोर पावलं टाकलेली आहेत हे संपूर्ण विरोधी पक्षाला माहित आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि वारसदार आहोत त्यामुळे या राज्यामध्ये महिलांचा अपमान, अत्याचार याबाबत सरकार संवदेनशील आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले-

मुख्यमंत्री महोदय तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती.