हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज ईडीकडून(ED) चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी रोहित पवार थोड्या वेळापूर्वीच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “भाजपविरोधात जे आवाज उठवतील त्यांच्याविरोधात ईडीचा फास आवळला जात आहे. आज संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई माध्यमांशी बोलताना, “ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत. या भाजपचा शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिले त्यांच्या विरोधात यांचा वापर होतो. जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमधे सहभागी होतात ते सुटतात, इतरांना त्रास दिला जातो. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे” असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी रोहित पवारांबरोबर
इतकेच नव्हे तर, “रोहित पवार यांच्यासोबत फक्त त्यांचा पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी आहे. सर्वात जास्त भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचे आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा दिली आहे. महाराष्ट्र अयोध्येतील रामाला भाजपमुक्त करेल” असे रोखठोकपणे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, “प्रफुल्ल पटेलांच्या जप्त केलेल्या वरळीतील बिल्डिंगमधेच ईडीने कार्यालय उभारल आहे. ज्यांच्यावर ईडीने खरंच करायला हवी त्यांचं काय? राहुल कुल, आरोग्य खात्यातील अॅम्ब्युलन्स घोटाळा यांचं काय? ईडी सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांना नोटिसा पाठवते. आजचे मुख्यमंत्रीही याच भीतीने तिकडे गेले, त्यांच्या सोबतचे अनेकजण ईडीमुळेचे तिकडे गेले. आम्ही आजवर किती घोटाळे बाहेर काढले, तरी त्यांना नोटीस ED पाठवत नाही, पण आम्हाला पाठवते” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.