हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशपातळीवर काँग्रेस होणारी एकूण पडझड पाहता काँग्रेसने लवकरात लवकर अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावावा. असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. जोपर्यंत काँग्रेस पक्षाला एक अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे, तो थांबणार नाही असेही राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चित्र दिसतंय. याचा फायदा भाजपासारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वानं अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.
काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे गांधी परिवारच आहे. तरीही पक्षाला अध्यक्ष हवाच. आता शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे प्रमुख आहेत. आम्ही सर्व काम करतो. पण नेते आहेत ते. प्रमुख पदावर एक नेता असतो. पक्षाला असा कोणी जर प्रमुख असेल तर त्यांच्या पक्षाला निश्चित गती मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात. नवी ऊर्जा मिळते. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने अध्यक्ष निवड करणं काळाची गरज आहे, असंही राऊतांनी सांगितलं.