कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानभवन नव्हे चोरमंडळ असे म्हणाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, आरसा’ हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील. जे तुम्ही नांव घेतलं ते, मला माहिती नाही त्याचं नाव. त्यांनी आरशासमोर उभे राहून तेच म्हणावं, म्हणजे त्यांना त्यांचं प्रतिबिंबाचं उत्तर आपोआप मिळेल.
खासदार उदयनराजे भोसले हजारमाची (ता. कराड) इथं आयोजित बैलगाडी शर्यतीसाठी आलेले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्तानं कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यात सध्या विधिमंडळ नसून चाळीस जणांचं चोरमंडळ आहे, असे म्हटले होते. त्याचा समाचार खा. भोसले यांनी घेतला.
खासदार उदयनराजे भोसले यांचे जोरदार स्वागत
छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व विजय यादव मित्रपरिवाराने बैलगाडा शर्यतीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. अोगलेवाडी येथून हजारमाची बैलगाडा शर्यत मैदानापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. मैदानावर छ. उदयनराजे भोसले यांना बैलगाडीतून हलगीच्या निनादात स्टेजपर्यंत नेण्यात आले.