हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?” हा निर्लजपणाच आहे! अशा शब्दात शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्र श्री भाजप नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. आता महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारीविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे. राज्यपाल कोश्यारी यानी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील वगैरे लोक सहन करतील; कारण सध्या ते ज्या पक्षाच्या पखाली वाहत आहेत त्या पक्षाचे ते धोरण आहे. पण विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्हयाचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही असं शिवसेनेने म्हंटल.
सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे’ यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, पण दुख है की, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करीत आहेत. आता आमच्या वाचकांसाठी अपमानाचे एक वेगळेच प्रकरण समोर आणतो. गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी असताना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडाच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले.
मोदीना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा। अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आहे. मोदींना रावण म्हटल्याने गुजरातच्या लोकभावना भडकू लागल्या, पण छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा म्हणे विरोधकांचा डाव आहे, असे भाजप सांगत आहे. यावरून भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते असं सामनातून म्हंटल आहे.
आता महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या संत्र्यापर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! विखे पाटील हे कधीकाळी मर्दमन्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठयांचा हा देश आहे. या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?” हा निर्लजपणाच आहे! अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.