हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपला इशारा दिला आहे. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल राऊत यांनी केला.
हा घोटाळा भाजपने केला असं आम्ही म्हटलं नाही. राम मंदिरासाठीची ट्रस्ट स्वायत्त आहे. त्यातील सदस्य कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तरीही तुम्ही टीका करता, ट्रस्टमध्ये काय भाजपची माणसं आहेत का? ट्रस्टला जर काही प्रश्न विचारले तर त्यांनी त्याचा खुलासा करू नये का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.