Wednesday, June 7, 2023

लतादीदी देशाचा अनमोल ठेवा, त्यांच्या स्मारकावरून राजकारण करू नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्कवर उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता लता दीदींच्या आठवणीना उजाळा देणारे स्मारक केंद्र आणि राज्य सरकार नक्कीच उभारेल मात्र त्यावरून कोणी राजकारण करू नये असे म्हंटल आहे.

संजय राऊत म्हणाले, लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका असे राऊत यावेळी म्हणाले. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करेल असे राऊत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, लता दिदी या काही राजकारणी नव्हत्या. ते असं व्यक्तीमत्व होतं की त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की त्यांच्या स्मारकाबद्दल देशालाही विचार कारावा लागेल असे म्हणत लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा राष्ट्रीय स्तरावर विचार केला जावा असे संकेत दिलेत