लालू यादव भाजपमध्ये सामील झाले असते तर ते हरिश्चंद्राचे अवतार ठरले असते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीची छापेमारी सुरु आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तर अटक झाली असून दुसरीकडे बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरावर सुद्धा ईडीने धाड मारली. या सर्व प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. लालू यादव हे भाजपमध्ये सामील झाले असते तर ते हरिश्चंद्राचे अवतार ठरले असते असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

९ विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिताच ‘सीबीआय’ लगेच लालूप्रसाद यादव यांच्या घरी पोहोचली व रेल्वेमंत्री पदाच्या त्यांच्या 2004 ते 2009 या काळातील एका प्रकरणाची चौकशी सुरू केली. श्री. लालू यादव है सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपण शस्त्रीक्रिया करून नुकतेच परत आले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्यापि सुधारणा नाही. तरीही त्या अवस्थेत सीबीआयने त्यांची सहा तास चौकशी केली. भाजप व त्यांच्या सरकारला 2004 सालातला भ्रष्टाचार खणून काढायचा आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी’ असे हे प्रकरण. 18 वर्षापासून त्याचा तपास सुरू आहे व त्यात लालू यादव कुटुंबाचा छळ चालला आहे. लालू यादव हे भाजपमध्ये सामील झाले असते तर ते हरिश्चंद्राचे अवतार ठरले असते!

मेघालयातील कॉनराड संगमा यांचे सरकार हे देशातील सगळ्यात भ्रष्ट सरकार असल्याचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा कालपर्यंत सांगत होते. मेघालयातील विधानसभा निवडणुकांत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा हा संगमा व त्यांच्या सरकारचा भ्रष्टाचार हाच होता. मोदी व शहा यांनी प्रत्येक प्रचार सभेत सांगितले, ‘संगमा हे भ्रष्ट आहेत व त्यांनी मेघालयाची लूट केली. केंद्राकडून मेघालयात आलेला हजारो कोटींचा निधी जनतेपर्यंत पोहोचला नाही.’ मग तो कोणी हडप केला? यावर मोदी-शहा यांनी संगमांकडे बोट दाखवले, पण त्याच भ्रष्टाचारी संगमांच्या सरकारात आता तेथील तोळामासा जीव असलेला भाजप निर्लज्जपणे सामील झाला व त्याच ‘भ्रष्ट’ संगमांच्या शपथविधी सोहोळ्यास पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा खास उपस्थित राहिले. संगमा यांच्या घरावर ईडी-सीबीआय पाठविण्याऐवजी मोदी-शहा व भाजप सरळ संगमांच्या सरकारमध्येच सामील झाले व भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी ईडी- सीबीआयचे पथक पोहोचले ते लालूप्रसाद यादव व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी. सिसोदिया यांना तर अटक करून तुरुंगात पाठवले अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

2019 पर्यंत भाजपच्या लेखी नारायण राणे भ्रष्ट व चोर होते. आज ते भाजपचे आदरणीय केंद्रीय मंत्री झाले. हेमंत बिस्वा सर्मा हे आता मोदी-शहांच्या अंतस्थ गोटातील मोहरा बनले आहेत. काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले व आता मुख्यमंत्री बनले. कॉंग्रेस मंत्रिमंडळात असताना हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची एक पुस्तिकाच भाजपने पुराव्यासह प्रसिद्ध केली होती. आसाममधील पाणीपुरवठा खात्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. Water Supply Scam म्हणून हा भ्रष्टाचार तेव्हा गाजला. हेच हेमंत बिस्वा सर्मा भाजपमध्ये जाताच त्यांची सगळी पापे भाजपने धुऊन घेतली.

भाजपात या आणि पवित्र व्हा. नाही तर तुरुंगात जा! ईडीचे काम काय? भाजपचे हे सरळ सरळ मनी लाँडरिंग आहे. आपल्याकडे काळे धन असेल तर भाजपात या, काळा पैसा पाढरा होईल व आपल्याला प्रतिष्ठा मिळेल. अशा असंख्य भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपने मनी लाँडरिंग केले हे उघड आहे. शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस अशा पक्षांतील अनेक भ्रष्ट नेत्यांवर भाजपने ‘मनी लांडरिंग व भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यातील बरेच लोक आज भाजपच्या गोटात आहेत. काळा पैसा घेऊन ते तेथे गेले. हा पैसा (POC) Proceed of Crime मधून मिळाला. म्हणजे मनी लाँडरिंग झाले. त्यामुळे संपूर्ण भाजपवरच त्यादृष्टीने मनी लाँडरिंगचा खटला चालवायला हवा असं संजय राऊत यांनी म्हंटल.