हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे (Crime In Maharashtra) प्रमाण वाढलं आहे. गणपत गाईकद्वार गोळीबार, शरद मोहोळ हत्या आणि त्यानंतर शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. एकीकडे राज्यात गोळीबाराची प्रकरणे समोर येत असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत या संपूर्ण परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. संजय राऊतांनी (Sanjay Raut) अनेकदा आपल्या ट्विटर हॅन्डल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो शेअर केलेत. यानंतर आजच्या सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातुन त्यांनी शिंदे- फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) लक्ष्य केलं आहे. मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात गुंडाराज सुरु आहे असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल-
महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे आज पूर्णपणे गुन्हेगारांच्या हाती गेली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात घुसून शिंदे गटाच्या लोकांवर गोळीबार केला. एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंडांचे राज्य चालवीत आहेत व ते गुंडांना पोसत असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. त्यावर भाजपचे सर्व मंत्री व नेते तोंडास कुलूप लावून बसले, कारण महाराष्ट्रातील शिदेपुरस्कृत गुंडगिरीस मोदी-शहांचे उघड आशीर्वाद आहेत. मुंबईतील लुटीचा मोठा वाटा दिल्लीतील भाजपच्या तिजोरीत जातोय हा त्यामागचा सरळ अर्थ. त्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राची पुरती वाट लागली तरी चालेल. भारतीय जनता पक्षाचाच एक आमदार स्वसंरक्षणासाठी हातात बंदूक घेतो व पोलीस स्टेशनात गोळीबार करतो. यावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया शून्य! भाजपवाले उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात, पण शिंदे यांनी पोसलेल्या गुन्हेगारीवर, वसुली धंद्यांवर बोलत नाहीत. महाराष्ट्रात जे सुरू आहे त्या पापाचे ते वाटेकरी बनले आहेत. नगर जिल्हय़ातील सुष्ठुरी येथे दाभाडे या वकील दाम्पत्याचे अपहरण करून हत्या झाली. असे प्रकार महाराष्ट्रात रोज घडत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे मंत्रालयात व त्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गुंड टोळय़ांच्या म्होरक्यांबरोबर बैठका घेतात. गुंडांना त्यांच्या पक्षात प्रवेश देतात. तुरुंगातील गुंडांची सुटका व्हावी यासाठी हस्तक्षेप करतात.
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा वाढदिवस म्हणे 4 फेब्रुवारी रोजी झाला. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गुंडांची मांदियाळीच जमली. शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज गुंडांनी लावले. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. गुंडगिरीचे इतके उघड समर्थन व उदात्तीकरण महाराष्ट्रात याआधी कधीच झाले नव्हते. शिंदे गटात प्रवेश करणारया गुंडांना लगेच पोलीस संरक्षण देऊन सन्मान केला जातो, हे अत्यंत गंभीर चित्र आहे. ज्या गुंडांची मुंबई-पुणे-ठाण्यात पोलिसांनी धिंड काढली, त्याच गुंडांच्या संरक्षणासाठी शिंदे यांनी आज पोलीस लावले. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारही त्याकामी मागे नाहीत. तेही गुडांच्या भेटीला पुष्पगुच्छ घेऊन जातात व श्री. अजित पवार ‘मोदींकडे आपली वट आहे,’ अशी भाषणे करतात. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे याच्याबरोबर अनेक गुंडांचे फोटो प्रसिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे ‘संघ’ परिवाराने ते फोटो पाठवायला हवेत, त्याचा उपयोग होणार नाही. तरीही महाराष्ट्रात त्यांनी काय कचरा उधळला आहे ते त्यांना कळू द्या.
चोऱया, लुटमार, दहशत व हत्या हेच महाराष्ट्राचे प्राक्तन बनले आहे. खतरनाक गुंड मंत्रालयात शिरून त्यांचे ‘रिल्स’ बनवतात व त्यांना अडवणाऱया कर्मचाऱयांना शिंदे पुत्राच्या नावाने धमक्या दिल्या जातात. हे सर्व महाराष्ट्रात का घडावे? महाराष्ट्र गुंडांचे राज्य व्हावे यासाठीच मोदी-शहांनी शिवसेना फोडली. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर ललित टेकचंदानी याने दिलेला जबाब पोलिसांनीच उघड केला तर सरकारची उरली सुरली इञ्जतही खतम होईल. शिंदे सरकारने गुंड पोसले. तसे गुंडांना संरक्षण देणारे पोलीस अधिकारीही पोसले. हे पोलीस अधिकारी गुंड टोळीचे सदस्य असल्याप्रमाणेच आज काम करीत आहेत. जणू काही शिंदे-पवार-फडणवीसांचे महाराष्ट्रातील गुंडाराज अनंत काळ चालणार आहे. गुंडांचे राज्य जाईल व त्यांना मदत करणाऱया खाकी वर्दीतल्या गुडांच्या हस्तकांचेही पंचनामे होतील. महाराष्ट्रात पाप टिकणार नाही! मोदी यांच्या डोळय़ांसमोरच हे घडेल! असं म्हणत संजय राऊतांनी संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.