मुंबई प्रतिनिधी । ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….’ हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र हे सर्व वर्तमानात घडत असतांना गेला काही काळ शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जीवाचे रान करत माध्यमात आणि राजकीय पटलावर मजबूत किल्ला लढवला. प्रसंगी भाजपकडून शिवसेनेवर होणाऱ्या शाब्दिक हल्ले संजय राऊत यांनी अंगावर झेलत सडेतोड प्रतिउत्तर दिले. कधी जाहीर पत्रकार परिषदेतून तर कधी ट्विटर वरून राऊत विरोधकांवर तोफ डागत राहिले. आता उद्धव ठाकरे यांच्या रूपात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर राऊत यांनी आपल्या स्वभावात थोडासा बदल करत खट्याळपणे ट्विटर वरून फडणवीस यांना चिमटा काढला आहे. ‘महाराष्ट्रात विरोधी पक्षच राहणार नाही असा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदी निवडले गेले याबद्दल त्यांचे अभिनंदन’ या आशयाचे ट्विट करत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा देखील साधला आहे.
महाराष्ट्र में विरोधी पक्ष ही नहीं रहेगा, यह दावा करने वाले पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विरोधी दल नेता चुने जाने पर हार्दिक बधाई…!
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
दरम्यान शपथ विधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करुन या दोघांचे आभार मानले आहेत. ”शिवसेनेच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे.” असे त्यांनी ट्विट करत आभार व्यक्त केले आहेत.
शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहोळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा.देवेंद्रजी फडणवीस व मा.चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद.
हे नाते असेच राहू दे.— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
महाराष्ट्रात विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही असे उद्गार काढणारेच आज विरोधी पक्षनेते आहेत.वेळ कुणावर कशी येईल हे आपण नाही तर नियती ठरवत असते म्हणून बोलुन विचार करण्यापेक्षा विचार करून बोला.