Santosh Deshmukh Murder Case| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये हत्येचा संपूर्ण तपशील आणि आरोपींविरोधातील ठोस पुरावे समाविष्ट आहेत. महत्वाचे म्हणजे, या घटनेचे थरकाप उडवणारे फोटो आणि व्हिडीओ चार्जशीटमध्ये जोडण्यात आले आहे.
व्हिडीओतून मिळालेले पुरावे
सीआयडीच्या तपासात असे उघड झाले आहे की, संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा लाइव्ह व्हिडीओ आरोपींनी मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये शेअर केला होता. या व्हिडीओतील काही स्क्रीनशॉट चार्जशीटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करताना, त्यांच्यावर पाय ठेवून फोटो काढताना आणि आरोपी सेल्फी घेताना दिसत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण घटनेदरम्यान आरोपी क्रूरमध्ये हसताना दिसत आहेत.
चार्जशीटमधील माहितीनुसार, हत्येच्या आधी संतोष देशमुख यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले होते. एका फोटोमध्ये त्यांच्यावर पाय ठेवून फोटो काढल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये एक आरोपी त्यांच्या छातीवर रॉडने मारहाण करताना दिसत आहे. आणखी एका फोटोमध्ये देशमुख रक्तबंबाळ अवस्थेत असताना एक आरोपी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढताना दिसत आहे. (Santosh Deshmukh Murder Case)
इतकेच नव्हे तर, संतोष देशमुख यांच्या हत्यावेळी त्यांचे कपडे काढण्यात आले होते. एका व्हिडीओमध्ये आरोपींनी त्यांच्यावर लघुशंका करत असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या या ठोस पुराव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच, या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तीव्रतेने केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात आठ आरोपींची नावे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आली आहेत. व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. आता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या अमानुष हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.