हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आहेत. कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नेताजी रामचंद्र चव्हाण यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकतीच अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ज 3) नुसार व कलम 16 (2) अन्वये सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून बांधकाम केले प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी रुवेश जयवंशी यांनी दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी अपात्रतेचे आदेश दिले आहेत. या कारवाईनंतर कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.
सुमारे 2 वर्षापूर्वी झालेल्या कोपर्डे हवेली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी अशी चुरशीची लढत पार पडली होती. या निवडणुकीत एकूण १५ जागांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसला 8 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत सरपंच पद खुल्या जागेसाठी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नेताजी चव्हाण हे सरपंच झाले. मात्र, नेताजी चव्हाण यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार शरद हिंदुराव चव्हाण यांनी 15 सप्टेंबर 2021 रोजी मा. जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली होती.
यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ग्रामसेवक, मंडलाधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्याकडून अहवाल मागवून दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी अपात्रतेचे आदेश दिले आहेत. या कारवाईनंतर कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केल्याने कराड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र जिल्हाधिकारी यांचे आदेशाला आव्हान म्हणून माजी सरपंच नेताजी चव्हाण यांनी पुणे आयुक्त यांचेकडे दाद मागितली आहे. पुणे आयुक्त यावर काय आदेश देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.