सासरच्यांनी मारहाण केल्याने साताऱ्यात जावयाने पेटवून घेतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेल्या युवकाला सासरा आणि मेहुण्याने मारहाण केली. सासरच्या मंडळीनी जावयाला मारहाण केली. सासरच्या मंडळीवर कारवाई करण्यासाठी साताऱ्यातील पोलीस मुख्यालयासमोर युवकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१४) घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी नवनाथ अशोक महापुरे (वय- ३२, रा. मल्हार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ महापुरे हा शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बाटलीतून पेट्रोल घेऊन पोलीस मुख्यालयासमोर आला. त्याने हातातील पेट्रोल अंगावर ओतले. हा प्रकार पोलीस मुख्यालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या निर्दशनास आला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता नवनाथ महापुरेला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्याच्याकडे पोलिसांनी या प्रकाराबद्दल चौकशी केली असता त्याने त्याच्याबाबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.

नवनाथची पत्नी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे काही दिवसांपूर्वी गेली आहे. तिला आणण्यासाठी तो श्रीगोंदा येथे गेला होता. त्यावेळी त्याचा मेहुणा महावीर गायकवाड व सासरे सर्जेराव गायकवाड यांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस नाईक राहुल खाडे यांनी रविवारी रात्री नवनाथ महापुरेच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.