सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर पुण्यात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणानंतर भाजप आक्रमक झाला असून आज सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. चंद्रकांत दादांचं वय पाहता त्यांच्यावरील शाईफेक निंदणीय असं म्हणत भाजप रस्त्यावर उतरली आहे.
हल्ला करण्याच्या मागचा सडका मेंदू कुणाचा आहे हे शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे युती सरकार चांगले आणि लोकहिताचे निर्णय घेत आहे. लोकांची कामे लवकर होत आहेत. जी कांमे महाविकास आघाडी ला जमली नाहीत ती कामे हे सरकार अत्यंत कुशलतेने करत आहे. अशावेळी बोलण्याचा चुकीचा अर्थ लावून लोकांच्यात गैरसमज निर्माण करायचा, त्यांची माथी भडकवायची असा उद्योग महाविकास आघाडी कडून सुरू आहे , पण इथून पुढे भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, याची नोंद विरोधकांनी घ्यावी असा इशारा आंदोलनावेळी देण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य अमित कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर , राहुल शिवनामे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे ,सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, नितीन कदम, चंदन घोडके, चिटणीस रवी आपटे, संतोष प्रभुणे ,माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख ,महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, उपाध्यक्ष वैष्णवी कदम ,उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे, सरचिटणीस मनीषशेठ महाडवाले, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर ,युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष अविनाश खर्षिकर, कामगार आघाडी शहराध्यक्ष तानाजी भणगे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते
पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले होते .