सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांचे प्रमाण पुन्हा वाढत चालले आहे. 12 तासांमध्ये 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 जणाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 3 आठवड्यापासून जिल्ह्यात एकही कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस शिल्लक नसल्याचे समोर आले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. अशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस अनेक नागरिकानी अद्याप घेतलेला नाही. अशात आता वारंवार लसीच्या डोसचा तुटवडा भासत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून लसीच्या डोसची मागणी केली जात आहे. जे नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आरोग्य विभागात येत आहेत. त्यांना लसीचा डोस देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात एकही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण 99 टक्के नागरिकांनी पहिला, 80 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे अद्यापि लसीकरणापासून 20 ते 22 टक्के नागरिक दूर आहेत. परंतु लसच उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.