कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषगाने कराड सोसायटी गटातील सहकार पॅनेलचे उमेदवार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तीन्ही बाबांच्या अनुपस्थितीचा विषय चर्चेत राहिला.
कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज सहकार पॅनेलमधून दाखल करण्यात आला आहे. तर विरोधात कै. विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील हे आहेत. येत्या रविवारी दि. 21 रोजी तीन दिवसांनी निवडणुसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील गजानन सोसायटीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यासाठी निवडणुकीत विजयाचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही नेत्यांना स्वताःच्या मतासोबत भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाची मदत लागणार आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून कृष्णा कारखान्यांचे उपाध्यक्ष जगदीश जगताप याच्या माध्यमातून भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाशी जवळीकता करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भोसले गट सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मदत करणार असल्याचे पालकमंत्र्यांच्या गटाने गृहीत धरले आहे. मात्र आज दि. 18 रोजी आयोजित मेळाव्यात भोसले गटाचे डाॅ. अतुल भोसले आणि डाॅ. सुरेश भोसले यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा पालकमंत्र्यांच्या गटात चुळबुळ सुरू झाली आहे.
गजानन सोसायटीतील मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात अनुपस्थितीत तिन्ही बाबांची मोठी चर्चा पहायला मिळाली. यामध्ये काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अनुपस्थितीत राहणार हे नक्की होते. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि सोसायटी गटातील उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे विरोधक डाॅ. अतुल भोसले उपस्थित राहतील किंवा ते नाही राहिले तरी त्याचे वडिल सुरेश भोसले उपस्थित राहतील असे मेळाव्यात गृहीत धरले होते. मात्र मेळाव्यात या तीन्ही बाबांची अनुपस्थिती हाच विषय मोठा चर्चेचा राहिला.