सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केलेल्या होत्या. परंतु सोमवार दिनांक 9 रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली आहे. तसेच जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे सातारा जिल्हा बँकेचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झालेला आहे.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक मे 2020 मध्ये होणार होती. पण कोरोनाचे संकटामुळे गेली पावणे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडलेली होती. या कालावधीत जिल्हा बँकांच्या निवडणुका तब्बल पाच वेळा स्थगित झाल्या होत्या. मुदत संपून मोठा कालावधी उलटल्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली होती.
परंतु आता सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला हिरवा कंदील दिला आहे. सरकारने आता अंतिम मतदार याद्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेची रणधुमाळी आता पुन्हा एकदा सुरू झाल्याने इच्छुकांची धांदल उडणार आहे.