सातारा | कोरोनामुळे गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सर्व 12 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे. यासाठी 3 सप्टेंबरपासून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 25 दिवस चालणार असून, त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या 12 बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रणधुमाळी सुरू होणाऱ्या व मुदत संपलेल्या बॅंकात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचाही समावेश असल्याने बिगुल वाजला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक जवळपास दीड वर्षे राज्य शासनाने वारंवार लांबणीवर टाकली होती. जिल्हा बॅंकांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत स्थगिती आहे. दोनच दिवसांपूर्वी शासनाने सहकारी संस्थांमधील केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवत ज्या टप्प्यावर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, तेथून पुढे त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, कोरोना काळात न्यायालयाच्या आदेशाने काही जिल्हा बॅंकांच्या निवडणुका झाल्या. उर्वरित मुदत संपलेल्या 12 जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या बॅंकांमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा यासह पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, धुळे-नंदुरबार या बॅंकांचा समावेश आहे.
बॅंकांची अंतिम मतदार यांनी तयार करण्याचा कार्यक्रम 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी 3 सप्टेंबरला कच्ची मतदार यादी जाहीर केली जाईल. तेथून पुढे दहा दिवस या यादीवर हरकती मागवल्या जाणार आहेत. दहा दिवसांनंतर त्यावर सुनावणी घेतली जाणार असून, पुढील पाच दिवसांत अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रम 25 दिवसांचा असणार आहे. अंतिम मतदार यांनी जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांनंतर व 20 दिवसांच्या आत प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागतो. हा कालावधी पाहता, जिल्हा बॅंकांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार, हे आता निश्चित झाले आहे.
या 12 जिल्हा बॅंकांची निवडणूक होणार
सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, धुळे-नंदुरबार या जिल्हा बॅंकांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात या 12 जिल्ह्याचे राजकारण तापलेले पहायला मिळणार आहे.