हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी नुकतीच जिल्हा प्रशासन व पोलिस दलासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा लाभली आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी मिळून संयम व शांततेने आनंदात पार पाडावा. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव उत्साहात, धुमधडाक्यात व कोणतेही गालबोट न लावता पार पाडूया. प्रशासन व नागरिकांत समन्वय राहण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना समजून घेण्याची, सामंजस्याची भूमिका ठेवावी, जिल्ह्यातील घडामोडींवर पोलिस आणि प्रशासनाने बारीक लक्ष ठेवावे, असे आदेश पालकमंत्री देसाई यांनी दिले.
पालकमंत्री देसाई यांनी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, ठाणे अंमलदार, पोलिस निरीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र डुडी म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीतील सदस्यांबरोबर यंत्रणांनी सातत्याने समन्वय ठेवावा. पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी यांच्याकडून सातत्याने माहिती घ्यावी. रोज बैठक घ्यावी. यंत्रणांनी कोणत्याही घटनेपासून अनभिज्ञ राहू नये.
त्यांच्यानंतर समीर शेख म्हणाले, गणेशोत्सव काळात चोख बंदोबस्त राहावा, यासाठी पोलिस आणि होमगार्ड यंत्रणा तैनात करण्यात येत आहे. गर्दीमुळे एखादी आपत्ती ओढवल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी दळणवळण यंत्रणांशीही समन्वय ठेवण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांना आचारसंहिता देण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल कार्यरत करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे गणेशोत्सव जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा झाला असून, यंदाही गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण अतिशय चांगल्या पद्धतीने व समन्वयाने साजरे करण्यात येतील.