सहकार मंत्र्यांनी बोलण्यापेक्षा एक रक्कमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत; साजिद मुल्ला यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

एक रकमी एफआरपी अधिक सहाशे रुपये या रास्त मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलनावेळी बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “सहकार मंत्र्यांनी एफआरपी देण्याबाबत मत व्यक्त करण्यापेक्षा एक रकमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील साखर कारखानदारांना द्यावेत, अशी टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केली.

बळीराजा संघटनेच्या वतीने कराड येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी माध्यमांशी संवाद सांडत सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, बावीस रुपये साखर होती तेव्हा आपण आंदोलन करून चोवीसशे ते पंचवीसशे रुपये दर घेतला. आता साखरेचा दर पस्तीस ते छत्तीस रुपये असून सुध्दा साखर कारखानदार दर वाढवून देण्याच्या मानसिकतेत नाही. साखरेला चांगला दर असून सुध्दा शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला.

एफआरपी कायदा काय सांगतो, उस गाळप झाल्यानंतर त्याचे बील चौदा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे आहे. आणि ते जर नाही जमा केले तर जेवढा कालावधी बील देण्यासाठी लागेल तेवढ्या कालावधीचे व्याज त्या शेतकऱ्यांना द्यायचे आहे. परंतू याबाबतीत सर्व मंत्री उदासीन आहेत. कोणत्याही मंत्र्यानी एक रक्कमी एफआरपीची अंमलबजावणी केलेली नाही. मग सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे बघायचे? सहकार मंत्री हे कारखानदारांना एफआरपी देण्याविषयी आवाहन करत आहेत. सहकार मंत्र्यांना अधिकार आहेत त्याचा वापर करून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखानदारांना एक रकमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करायचे आदेश द्यावेत, असे मुल्ला यांनी सांगितले.