सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरातील मोबाईल चोरी प्रकरणी सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीस कर्नाटकातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांनी संबंधित चोरट्याकडून तब्बल 97 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत.
सादीक बाबाजान मुंडारेगी (वय 19), रा. जामिया मशिदीच्या समोर, होसारेती, ता. जि. हावेरी, राज्य कर्नाटक असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शाहपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक मोबाईलबाबत तांत्रिक माहिती काढत असताना एक मोबाईल हँडसेट कर्नाटक राज्यातील हावेरी या जिल्हयामध्ये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी त्या माहितीच्या आधारे शाहपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हेड. कॉ. हसन तडवी व पो. कॉ. स्वप्निल सावंत याचे पथक तयार केले. तसेच त्यांना कर्नाटक राज्यात पाठवून संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. त्यांनीही कर्नाटक राज्यातील विविध भागात शोध घेत स्थानिकांचे मदतीने आरोपी शोधून काढले. आणि त्याला ताब्यात घेतले.
संबंधित आरोपीस सातारा येथे आणून त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने चोरलेले मोबाईलही त्याने परत केले. हि कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो. ना. अमीत माने, स्वप्नील कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पो.हेड.कॉ. हसन तडवी हे करीत आहेत.