सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जिल्ह्यातील वडूज, आैंध, उंब्रज पोलिस ठाण्यात, तसेच पुणे, बीड, नगर आदी ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 13 जणांवर सातारा पोलिसांनी मोक्का लावला आहे. कराड तालुक्यातील मसूर येथील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या या टोळीविरोधात पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मोकांतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मान्यता दिली.
मार्च महिन्यात मसूर येथे सशस्त्र दरोडा पडला होता. संशयितांनी घराचे दार उचकटून आत प्रवेश करत शस्त्राने घरात असणाऱ्या मारहाण करत सोन्या- चांदीचे दागिने लुटले होते. या प्रकरणाचा तपास उंब्रज, तसेच स्थानिक गुन्हे शाखेने करत आष्टी (बीड) येथील काही संशयितांना पकडले होते. पकडलेल्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर लुटलेला ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. पकडलेल्या संशयितांची टोळी असून, त्यांच्यावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले.
यामध्ये होमराज ऊर्फ होम्या उद्धव काळे, अतुल लायलन भोसले, धल्ल्या अक धर्मेंद्र ननशा काळे, कानिफनाथ उद्धव काळे, सुनीता होमराज काळे (सर्व रा. वाकी शिवार, आष्टी), अजय ऊर्फ आज्या सुभाष भोसले, सचिन ऊर्फ आसी सुभाष भोसले, अविनाश ऊर्फ आवी सुभाष भोसले, रुस्तुमबाई सुभाष भोसले, गणेश ऊर्फ बन्सी रंगिशा काळे (सर्व रा. माही जळगाव, कर्जत), राहुल ऊर्फ काळ्या पद् भोसले (रा. वाळूज पारगाव, पाथर्डी), संतोष विनायक पंडित, नीलेश संतोष पंडित (रा..आरणगाव, नगर) यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.