सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हर फ्लो झाले असून सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कांदाटी खोऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे. पूर्वीपेक्षा कास धरणाची उंची वाढविण्यात आली असूनही धरण भरल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेले कास पठारावरील कास धरण भरलेले आहे. याठिकाणी पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासोबत धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत. सातारा शहरातील नागरिकांना या धरणातून वर्षभर पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे दरवर्षी पाणीसाठा झाल्यानंतर भक्तीभावाने सातारा नगरपालिका आणि पदाधिकारी यांच्याकडून कासच्या पाण्याचे जलपूजन करण्यात येत असते. यावेळी खा. छ. उदयनराजे भोसले, आ. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहत असतात.
सातारा :कास धरण ओव्हरफ्लो @HelloMaharashtr pic.twitter.com/rJewNqgU3u
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) July 16, 2022
साताऱ्याची जलदेवता म्हणून संबोधले जाणारे कास धरण आज शनिवारी दि. 16 जुलै रोजी पहाटे पूर्ण भरले. सध्या धरणामध्ये 0. 03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कास धरण क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने कास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. कास धरणाची उंची 50 फुटापर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या धरणात 48 फुटांचा पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रात पाऊस चांगलाच सुरू असून येत्या काही दिवसांत ही धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज व्यवस्थापनाकडून व्यक्त केला जात आहे.