सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा तालुक्यातील मालगाव येथे वन्यप्राणी तरस शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फास्यामध्ये अडकला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरस प्राण्यास सोडवले. तसेच तरसास वन्यप्राणी अधिवासात सोडले आहे.
मालगाव येथे काल सकाळी 11.30 वाजता वनविभागाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर वनरक्षक सातारा सुहास भोसले, डाॅ. चव्हाण यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी सातारासह पुण्याची रेस्क्यू टीमही तरस प्राण्यास फास्यातून सोडविण्यासाठी मालगाव येथे दाखल झाली होती. या मोहिमेत उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी सातारा व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
वन्यप्राण्यास पकडण्यासाठी कोणी फासे टाकत असेल किंवा इतर यंत्र, हत्याराचा वापर शिकारीसाठी केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गंभीर गुन्हा आहे. तेव्हा अशा प्रकारचे कृत्य कोणी करू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.