सत्यजित तांबेंचा धक्कादायक खुलासा; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षाने आम्हाला जे २ एबी फॉर्म दिले त्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचा उल्लेखच नव्हता असा धक्कादायक खुलासा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषेदेत हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

काँग्रेसकडून मला जे २ एबी फॉर्म देण्यात आले त्यामध्ये औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदार संघाचे फॉर्म होते. नाशिक पदवीधर मतदार संघाचे नावच नव्हतं. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी बाळासाहेब थोरात याना अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. मी तरीही काँग्रेसकडून च फॉर्म भरला होता मात्र एबी फॉर्म नसल्याने माझा अर्ज अपक्ष मध्ये कन्व्हर्ट झाला अशी माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा प्रश्न सत्यजित तांबे यांनी केला.

मी त्यानंतर दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधला असता पक्षाने मला माफी मागायला सांगितली. माझी चूक नसताना सुद्धा मी माफी मागायला तयार झालो होतो. परंतु एकीकडे माझी हायकमांडशी चर्चा सुरु असताना इथे मात्र या लोकांनी दुसऱ्यानाच पाठिंबा दिला. म्हणजे तांबे कुटुंबाला काँग्रेसमधून बाहेर करण्याचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर केला आहे.

दरम्यान, आमच्या परिवाराला २०३० ला काँग्रेसमध्ये १०० वर्ष होतील. काँग्रेसमध्ये आम्ही निष्ठेने काम केलं. २०१८ ला युवक कांग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर काँग्रेस साठी आव्हानात्मक परिस्थिती असूनही संपूर्ण राज्यात चांगले उपक्रम राबवले आणि चांगले काम केलं असेही सत्यजित तांबे म्हणाले. मी काँग्रेस सोडली नाही परंतु मी अपक्षच राहणार आहे असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या शक्यतेला पूर्णविराम दिला आहे.