हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आधीच पेट्रोल डिझेलच्या किमती, गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक तेल निर्मात्यांपैकी एक असलेल्या या देशाने आपल्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम भारतासह जगातील इतरही अनेक देशांवर होणार आहे. सौदी अरेबिया बरोबरच ओपेक संघटनेचा सदस्य असलेल्या रशियानेही तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत 80 टक्के आयात करत असल्यामुळे आपल्याला याचा मोठा फटका बसू शकतो.
भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. सध्या भारत रशियाकडून कमी किंमतींत तेल विकत घेत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान अनेक युरोपीय देशांनी रशिया बरोबर व्यापार करण्यास बंदी घातली होती. त्याचप्रमाणे अनेक देशांनी रशियाकडून तेल खरेदी देखील बंद केली होती. मात्र अशा परिस्थितीत भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले.
काही मीडिया रिपोर्ट्स नुसार, भारताची रशियाकडून होत असलेली तेलाची आयात तब्बल 33 टक्क्यांनी वाढली आहे. यासाठी जर आपण मार्च महिन्यातील आकडेवारीकडे पाहिली तर यावेळी भारताने रशियाकडून दर महा 16 लाख 40 हजार बॅरल तेल खरेदी केले आहे. यापूर्वी भारत तेलाची आयात करण्यासाठी संपूर्णपणे इराकवर अवलंबून होता परंतु त्यांनतरच्या काळात आपण सौदी अरेबिया कडून तेल आयात करू लागलो. अजूनही भारताला सर्वात जास्त तेलाचा पुरवठा करणारा देश सौदी अरेबिया हा आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.




