… तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; राऊतांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भारत जोडो यात्रेत सावरकरांचा विषय आला कुठून असा सवाल करत यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं म्हंटल आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर भारत जोडो यात्रा महागाई, बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर सुरू असताना वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरज नव्हती. सावरकरांचा विषय काढल्याने फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसलाही धक्का बसला आहे असं राऊत म्हणाले. सावरकरांमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडलं आणि काय घडलं नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडला असा सल्ला संजय राऊत यांनी राहुल गांधींना दिला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. भाजपमधील आणि इतर नवीन सावरकर भक्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी का करत नाहीत? असा सवाल करत सावरकर हे कधीच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदर्श नव्हते अशी टीकाही संजय राऊत यांनी भाजपवर केली.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल-

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. येव्हडच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली.