औरंगाबाद – फोन पेवरील पेमेंट पेंडिंग असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कस्टमर केअरला फोन करण्यासाठी गुगलवर सर्च करून नंबर घेतला. गुगलवर मिळालेल्या नंबरवर फोन केला असता, अनोळखी व्यक्तीने डेबिट कार्डवरील माहिती विचारून, स्टेशन अधीक्षकाला 40 हजार 11 रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्याच्या शिफारशीनुसार वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद येथील रेल्वे स्थानकात स्टेशन अधीक्षक असलेले लक्ष्मीकांत किशनराव जाखडे (वय 58, रा.प्लॉट नं.19, निराला अपार्टमेंट, गोविंदनगर, बन्सीलालनगर) यांचे फोन पेवरील पेंमेंट पेंडिंग होते. हे पेमेंट करण्यासाठी त्यांना एसबीआय बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर हवा होता. तो मिळविण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. तेव्हा त्यांना गुगलवर नंबर मिळाला. त्यावर त्यांनी फोन केला. तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीने जाखडे यांना विश्वासात घेऊन डेबिट कार्डवर असलेला 16 आकड्यांचा क्रमांक विचारला. जाखडे यांनीही तत्काळ तो सांगितला. त्यानंतर, काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 40 हजार 11 रुपये डेबिट झाले. ही घटना 4 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणात सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार, 3 डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हेगारांचे झारखंड कनेक्शन
स्टेशन अधीक्षकांना फसविणाऱ्या टोळीचे झारखंडचे कनेक्शन असल्याची चौकशीत समोर आले आहे. गुरगाव येथील सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे पैसे परत मिळविण्यासाठी आरोपींना झारखंड येथून शोधून आणावे लागणार आहे.