वर्धा प्रतिनिधी । वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाच्या विविध योजनेतून जमा झाले अनुदान जमा आहे. मात्र त्यांच्या खात्याला होल्ड लावल्याने त्यांना ही रक्कम विड्राल करता येते नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते आहे. अजूनपर्यंत कोणत्याही तोडगा निघाला नसल्याने संतापलेल्या प्रहार जनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख देवा भाऊ धोटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.
यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी निंभा येथिल भारतिय स्टेट बँकेच्या शाखेत धडक देत जो पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर लावलेले होल्ड काढणार नाही तो पर्यंत आम्ही बॅक सोडणार नाही. असा निर्धार करीत ठिय्या आंदोलन करुन व्यवस्थापकाला चांगले धारेवर धरले. या आंदोलनामुळे बॅक कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.