हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्टेट बँकेला 9000 कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने विजय मल्ल्या यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय दिला होता, मात्र ही कारवाई करू नये अशाप्रकारची याचिका मल्ल्यानी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान मल्ल्याच्या वकिलाने दावा केला आहे की, त्यांना त्यांच्या अशिलाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. ते स्वतः अंधारात आहेत. अशा स्थितीत मल्ल्याला या प्रकरणात दणका बसणे अपरिहार्य होते. कारण त्यांच्या बाजूने लढणारे वकील स्वतः अनेक मुद्द्यांवर स्पष्ट नव्हते.
यापूर्वी 5 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याला पीएमएलए कायद्यांतर्गत फरार घोषित केले होते. कायद्याच्या तरतुदींनुसार, एखाद्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यावर, फिर्यादी संस्थेला त्याची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आहेत. विजय मल्ल्या मार्च 2016 मध्ये ब्रिटनला पळून गेला होता. पण अद्याप त्याला भारतात आणण्यात यश आलेलं नाही.