हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षवर सर्वोच्य न्यायालयाने काल निर्णय जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर बोट ठेवले. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही पुन्हा त्यांचं सरकार आणलं असत अस कोर्टाने आपल्या निरीक्षणात म्हंटल. ९ महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होते असं मत व्यक्त केलं होते. त्यामुळे ठाकरेंची राजीनामा देण्याची चूकच महाविकास आघाडीला महागात पडली आहे.
उध्दव ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं. घाईघाईत राजीनामा देऊन त्यांनी मोठी चूक केली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच म्हटलं होतं. ठाकरेंनी त्यांच्यापुढची परिस्थिती विधानभवनात मांडली असती, तर त्याची नोंद विधिमंडळाच्या कामकाजात झाली असती. बहुमत सिध्द करण्यात अपयश आले असते तरी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लघंन जनतेसमोर झालं असतं. या सर्व गोष्टी आणि त्यांचं भाषण रेकॉर्डवर राहिलं असतं,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. आज पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवलेले मत खरं ठरलं असं म्हणता येईल.
दरम्यान, आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नैतिकतेच्या आधारवर मी त्यावेळी राजीनामा दिला, मला त्याची खंत वाटत नाही. जरी कायदेशीरदृष्ट्या राजीनामा दिला हे चूक असू शकते, पण नैतिकता बघितली तर ज्या पक्षाने आणि माझ्या वडिलांनी ज्यांना सगळं दिलं त्यांच्यासाठी मी विश्वास आणि अविश्वास का दाखवू? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. सर्व काही देऊन त्यांनी माझ्या पाठीत वार करावा, माझ्यावर अविश्वास आणावा हे मला पटलं नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून जर मला विश्वासदर्शक अविश्वासदर्शक ठरावाबाबत विचारलं जात असेल तर ते चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.