नवी दिल्ली । पंजाबमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. लग्न न केल्यास तुरुंगात रवानगी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती एएस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी झाली. पंजाबमधील एक उच्चवर्णीय मुलाने अनुसूचित जातीतील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत तिचे शोषण केल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. २२ डिसेंबर २०२० रोजी दोन्ही कुटुंबात एक करार होऊन या दोघांच्या लग्नावर सहमती झाली होती.
मात्र, मुलगी सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ती भारतात आल्यावर दोघांचे लग्न लावून देण्यात येईल, असे वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. यावर, हा करार कारवाईपासून बचावासाठी केला नाही ना, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. मात्र, वकिलांकडून न्यायालयाला याबाबत आश्वस्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या तरुणाच्या अटकेला स्थगिती देत, जर मुलाने लग्न केले नाही, तर त्याने तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, अशा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.