सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग करावे लागणार असून त्यादृष्टीने वेळापत्रक तयार केले आहे. लवकरच ते जाहीर केले जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या काळात तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या काळात घेण्याचे नियोजन पुणे बोर्डाकडून करण्यात आले आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नियोजित परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचेही निश्चित झाले आहे. मात्र, कोरोनाने पुन्हा जोर कायम राहिल्यास 10 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून परीक्षा केंद्रांबाबत स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्य असल्याने ऑफलाईनच परीक्षा होतील, असेही परीक्षेसंदर्भात स्थापन केलेल्या सल्लागार समितीतील सदस्यांनी आज स्पष्ट केले.
‘शाळा बंद अन् ऑनलाइन शिक्षण सुरु’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहेत. सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्याने उन्हाळी सुट्ट्यांमध्येही शिक्षकांना ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावेच लागणार आहे. या काळातील शिक्षकांचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. राज्यातील सोलापूर, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, अकोला, अमरावती यासह अन्य काही जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर, औरंगाबाद, अमरावती या जिल्ह्यात काही दिवसांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांनी तशी तयारी केल्याने बंद झालेल्या शाळा कधीपासून सुरु होतील, हे अजूनही अस्पष्टच आहे. त्यामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्यांमध्येही काम करावे लागणार आहे.
कोरोना काळात सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने शिक्षण देत आपापल्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले आहे. परंतु, कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत काही तासांची शाळा सुरु ठेवण्याचे नियोजन केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.