नवी दिल्ली । रिलायन्स जिओ पाठोपाठ आता आणखी एका भारतीय कंपनीत मोठी परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारी अमेझॉन कंपनी देशातील भारती एअरटेल मधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमधील २ अब्ज डॉलर इतका हिस्सा खरेदी करू शकते.
एअरटेल आणि अमेझॉन यांच्यातील हा करार झाला तर देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनीत अमेझॉनची सध्याच्या बाजारभावाने ५ टक्के हिस्सेदारी होईल. एअरटेलचे भारतात ३० कोटी ग्राहक आहेत. देशात सर्वात जास्त ग्राहक रिलायन्स जिओकडे आहेत. एअरटेल आणि अमेझॉनमधील कराराची चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा जगातील अनेक कंपन्या रिलायन्सचा जिओ कंपनीत गुंतवणूक करत आहेत. भारतात जिओ आणि एअरटेलमध्ये जोरदार स्पर्धा आहे.
रॉयटर्सनुसार एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात कराराची चर्चा प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या ही चर्चा गोपनीय आहे. आम्ही भविष्यात काय करणार आहोत आणि काय नाही याबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत नाही, असे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात जर २ अब्ज डॉलरचा करार झाला तर भारतीय बाजारात एअरटेल आणि जिओमधील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”