औरंगाबाद – शहरातील मिसारवाडी भागात बांधकाम व्यवसायिक हसन साजेद पटेल याच्यावर चाकूने 36 वार करून हत्या करण्यात आली होती. हसन याची एवढ्या निर्घृणपणे हत्या करण्याचे नेमके काय कारण असेल, याचा शोध पोलीस घेत होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तालेब सुलतान चाऊस याला पकडल्यानंतर हे हत्याकांड जुन्या वादातून घडल्याचे समोर आले आहे. आरोपी तालेब चाऊसनं दिलेल्या कबुलीतून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हसन पटेल याने आधी माझ्यावर 25 वार केले होते, त्याचा काटा काढण्यासाठी मी 36 वार केल्याची कबुली चाऊसनं दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन आणि तालेब हे दोघेही जुने मित्र होते. मागील वर्षी दोघांमध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. याच वादातून हसन पटेल यांनी तालेबवर चाकूहल्ला केला होता. या प्रकरणी सिडको पोलीस स्टेशनमध्ये 14 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आळा होता. हे प्रकरण मिटवण्याचे हसनचे प्रयत्न होते. गुन्हा मागे घेण्याची विनंतीही त्याने तालेबकडे केली होती. पण तक्रार मागे घ्यायची असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी चाऊस कुटुंबियांनी हसनकडे केली होती. हा समझोता झाला नाही आणि वाद आणखीच चिघळत गेला. तसेच हसन नेहमीच चाऊस कुटुंबियांकडे पाहून थुंकायचा. विशेषतः तालेबचे वडील सुलतान चाऊस यांच्याकडे पाहून थुंकणे, सिगारेटचा धूर त्यांच्या दिशेने सोडणे असे प्रकार हसन करत होता.
दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तालेब चाऊसला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहेत.