सांगली | सांगली मिरज रोडवर असणाऱ्या अपेक्स कोविड केअर सेंटर मध्ये काही दिवसांपूर्वी बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली होती. या रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा पाढाच वाचला.
रुग्णलयाबाहेर बाउन्सर ठेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी सोडले जात नाही, तसेच लाखो रुपयांची बिले आकारून लूट केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त कापडणीस यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्तांनी या रुग्णालयात आता नवीन रुग्ण नोंदणी करायची नाही असे आदेश दिले असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.
तसेच महात्मा फुले आरोग्य योजना खाजगी रुग्णालयांनी गुंडाळून कृष्णेच्या डोहात टाकली आहे. अव्वाच्या सव्वा दराने लाखो रुपये लुटले जात आहेत. जिल्ह्यात अनेक मृत्यूची संख्या दाबली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खुर्ची मधून उठून बाहेर येऊन गावात जाऊन आढावा घ्यावा. सगळे सुटा बुटातील अधिकारी ऑफिस मध्ये बसून काम करत आहेत अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली.