फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. सर्वांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हा परिषद/पंचायत समिती अधिकारी कर्मचारी आणि प्रा. शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वरील तीनही घटकांनी प्रत्येकी २ हजार रुपयाप्रमाणे निधी उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरून त्यातून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटर मशीन्स उपलब्ध करुन देण्याची योजना मांडल्यानंतर सर्व संघटना प्रतिनिधींनी हा प्रस्ताव मान्य केला.
त्यानंतर तालुका पातळीवर प्रत्येक पंचायत समितीमध्ये बैठक घेऊन तेथेच प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे निधी संकलन करण्याचा निर्णय अध्यक्ष उदय कबुले यांनी घेतला. त्याप्रमाणे सर्व पंचायत समित्यांना सूचित करण्यात आले. सदर निधी बुधवार दि. ५ मे अखेर केंद्रनिहाय नियोजन करुन सर्व केंद्रप्रमुख यांचेकडे तात्काळ जमा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
फलटण पंचायत समिती कार्यालयात सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकिस गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे, फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba