हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर एका बाजूला अजित पवार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्याकडून संपूर्ण राज्याचा दौरा सुरू करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी शरद पवार यांची भव्य सभा कोल्हापुरात पार पडणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या या सभेचे अध्यक्षस्थान, कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज उभे राहतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांची बीड येथे भव्य सभा पार पडली आहे. त्यानंतर आता येत्या शुक्रवारी (२५ ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये देखील शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. मुख्य म्हणजे, या सभेचे अध्यक्षस्थान थेट श्रीमंत शाहू महाराज यांनी स्वीकारलेले आहे. आता शाहू महाराज यांनी राष्ट्रवादीच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच येथे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने शाहू महाराज उभे राहतील का हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार आणि शाहू महाराज यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. जर शाहू महाराज यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तर आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार बाजी मारू शकतात हे निश्चित होईल. तसेच याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होईल. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शाहू महाराज यांच्याकडे शरद पवारांनी फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभाग नोंदवल्यामुळे आगामी निवडणुकात अजित पवार विरुद्ध शरद पवार पाहायला मिळणार आहेत. तसेच, अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप यांच्या विरोधात महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळेल.