सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या 29 तारखेला होणार आहे. त्यांच्या अटकेप्रकरणी आज राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यातील मुंबईतील वातावरण बिघडवण्याचे काम राणा दांपत्यांनी केले. त्यांनी चिथावनीखोर वक्तव्य केली तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊ नका असे सांगितले असतानाही त्यांनी त्या ठिकाणी येण्याचा अटहास केला. म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, अशी माहिती मंत्री देसाई यांनी दिली आहे.
मंत्री देसाई यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. त्याने केलेल्या कृत्याबद्दल पोलिसांना जे काम करायचे होते ते त्यांनी चोखपण बजावले आहे. त्यांच्या कामात मंत्रीमंडळातीलही कोणीही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे कोणावर कारवाई करण्याचे काहीच कारण नाही.
नेमका काय घडला प्रकार?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले होते. त्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकूण सर्व परिस्थिती पाहून राणा दाम्पत्याने माघार घेत आपण मातोश्रीवर जाणार नाही अशी घोषणा केली. मात्र त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून राणा दाम्पत्याला अटक करत रात्रभर सांताक्रुझ पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले.