सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगाव दौरा करणार आहेत. तत्पूर्वी या दौऱ्यावर लक्ष करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिला आहे. यावर आज उत्पादन शुल्क मंत्री व बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिले. कर्नाटक सरकारने अशी 100 पत्र पाठवली तरी 6 तारखेला मी व चंद्रकांत पाटील बेळगावला जाणारच आहोत, असे देसाई यांनी म्हंटले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक सरकारने 100 पत्रे जरी महाराष्ट्र सरकारला पाठवली तरी त्याच्या काहीच परिणाम होणार नाही. आम्ही दोन्ही मंत्री 6 डिसेंबर रोजी काहीही झाले तरी त्या ठिकाणी जाणार आहोत. आम्ही उद्याच (3 डिसेंबर) रोजी जाणार होतो. पण तेथील समितीच्या लोकांनी आम्हाला 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी यावे असे सांगितले. त्यानुसार आम्ही त्याठिकाणी जाणार आहोत.
हे राज्य, हा देश लोकशाहीने चालणारा देश आहे. एखाद्या राज्याच्या सचिवाने आमच्या राज्यात येऊ नये असे म्हणणे योग्य नाही. या स्वतंत्र भारतात देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील कुठलीही व्यक्ती कुठेही मुक्त संचार करू शकते त्याप्रमाणे आम्ही जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/843733130005934
बसवराज बोम्मई नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे म्हंटले.