हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं असेही त्यांनी सांगितलं.
पुण्यातील एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, मी पहिली निवडणूक बैलजोडीवर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं.आम्ही चरख्यावर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, आम्ही हातावर लढलो.नंतर आमचं चिन्ह गेल्यावर आम्ही घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं आमचं पक्षचिन्ह काढून घेतलं नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याची उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱ्याच्या हातात दिलं हे देशात घडलं नव्हतं, ते सुद्धा निवडणूक आयोगाने करून दाखवलं असं शरद पवार यांनी सांगितलं.
मी निवडणुकीला उभं राहणार नाही- Sharad Pawar
दरम्यान, काहीजण भावनिक करतील, शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील परंतु त्यांना बळी पडू नका असं विधान अजित पवारानी शरद पवार याना उद्देशून केलं होते, त्यावर सुद्धा पवारांनी उत्तर दिले. मी निवडणुकीला उभं राहणार नाही हे मी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं भावनिक बोलायची गरज नाही. बारामतीचे लोक हुशार आणि समजदार आहेत. बारामतीत कामे कोणी केली आणि बारामतीची प्रतिष्ठा कुणी वाढवली आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळं ते योग्य निर्णय घेतली, असं शरद पवार म्हणाले.