सगळं नाटक… लोकसभेनंतर दोन्ही पवार एकत्र येतील??

Sharad Pawar Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) इंडिया आघाडी सोबत यायला तयार असतील तर स्वागतच आहे, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घड्याळाचा काट्याला काटा घासत असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेलं हे स्टेटमेंट. महाराष्ट्राच्या राजकारणाला एखाद्या चित्रपटासारखा रंग आलाय तो पवार विरुद्ध पवार या संघर्षामुळे… कितीही संकट आली तरी पवार कुटुंब फुटणार नाही, असं अभिमानानं सांगणाऱ्या याच कुटुंबातील अजितदादांनी वेगळी चूल मांडली. घड्याळ विरुद्ध तुतारी अशा अनेक मतदारसंघातील निवडणुका जिंकण्यासाठी घासून प्रचार चाललाय. एकमेकांच्या काळातील राजकारणाला नख लावण्यापासून आपल्याच एकेकाळच्या विश्वासू सहकाऱ्यांवर जहरी टीका होतेय… हे सगळं दोन्ही विरुद्ध टोकांना जाणारं घडत असल्यामुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल, अशा सर्वच शक्यता जवळपास मावळल्या आहेत. पण तरीदेखील एक लाईन जनतेमध्ये वारंवार रिपीट केली जातेय ती म्हणजे, ‘अजित पवार आणि शरद पवार लोकसभेनंतर हमखास एकत्र येतील’ याची… पण हा केवळ हवेतला आशावाद नसून असं बोलण्यालाही अनेक ठोस कारणं आहेत. भल्याभल्यांचं राजकारण संपवणारी आणि अनेक नव्या चेहऱ्यांना राजकारणात उभारी देणाऱ्या या काका पुतण्याची जोडी महाराष्ट्राला पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहायला मिळेल, हे आम्ही तुम्हाला नेमकं कोणत्या बेसिसवर सांगतोय? पवार कुटुंबाच्या राजकारणाची खासियत काय आहे? याचाच धांडोळा घेऊयात,

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गटातटात राहून बेरजेचं राजकारण करणाऱ्या जुन्या फळीतील काही नेते मंडळींपैकी आजही राजकारणात सक्रिय असणारं नाव म्हणजे शरद पवार. वसंत दादा पाटलांना धक्का देत पुलोदचा प्रयोग करणारे शरद पवार, सोनिया गांधी विलायतेतून आल्याचा मुद्दा तापवत काँग्रेस मधून बाहेर पडत राष्ट्रवादी हा आपला पक्ष उभा करणारे शरद पवार, लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्याच पक्ष सोबत महाराष्ट्रात आघाडीचं सरकार बनवणारे शरद पवार, 2014 ला भाजपाला बाहेरून पाठिंबा देत सरकारला स्टॅबिलिटी देणारे शरद पवार आणि या सगळ्याचा कळस म्हणजे शिवसेनेला आपल्या तालमीत घेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचा आगळावेगळा प्रयोग करणारे शरद पवार.. ही सगळी टाईम लाईन डोळ्याखालून घातली, तर शरद पवार कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात, या वाक्याला आणखीन सबळ पुरावे मिळतात.

ज्या पक्षाला आपण मोठं केलं. तो पक्षच ज्याला आपण राजकारणाचे बाळकडू पाजले त्या पुतण्याने पळवून नेल्यानंतर शरद पवार आजही शांत, मितभाषी आणि कुठलाही आतातायीपणा करताना दिसत नाहीयेत. अजितदादांवर आणि फुटलेल्या सहकारी नेत्यांवरही जहरी शब्दात टीका करत नाहीयेत. याउलट या वयातही शरद पवार आजही चेहऱ्यावर स्मितहास्य टिकवून आहेत. या सगळ्यामुळे पवार येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राजकारण पेरून फुटलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा एकसंघ करतील, असं म्हणायला स्कोप उरतो. लोकसभेच्या निमित्ताने कठीण काळातही शरद पवारांनी केलेल्या अनेक राजकीय बेरजा पाहता या बोलण्याला आणखीनच बळ मिळतं…

पवार कुटुंब एकत्र येईल असं म्हणायला अजून एक ठोस कारण म्हणजे राष्ट्रवादीत जे काही घडतंय ते सगळं मोठ्या नाटकाचा छोटा अंक असल्याचा…अजितदादांनी पहाटेचे बंड केलं आणि ते फसलं… शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला…सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळ्यांच्या आरोपांनी डोकं वर काढलं…70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा उल्लेख नरेंद्र मोदींनी भर सभेत केला…आणि काही दिवसातच अजितदादांनी पक्षातील मातब्बरांना सोबत घेत राष्ट्रवादी फोडली…एखाद्या सिनेमातल्या क्लायमॅक्स प्रमाणे घडलेल्या या गोष्टी बघितल्या तर हा शरद पवारांनी लिहिलेल्या एका मोठ्या नाटकाचा छोटा अंक तर नाहीये ना, अशी शंकेची पाल मनात चूकचुकते. कारण शरद पवार लांबचं पाहून करंट पॉलिटिक्स खेळणारे नेते आहेत. वारं कोणत्या दिशेला फिरणार आहे? याचा अचूक अंदाज पवारांना असतो, असं म्हणतात. थोडक्यात तुतारी विरुद्ध घड्याळ असं जे काही सध्या चित्र निर्माण करण्यात आलय तो पवारांनीच जाणीवपूर्वक रचलेला बनाव आहे, असंही अनेकजण बोलतात…

हा सगळा खटाटोप करून पवारांनी नेमकं काय साध्य केलं? तर सांगतो…नंबर एक 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपामुळे अजितदादांवर होणारी संभाव्य कारवाई टळली… आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पाठीशी ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता तो थांबला… राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत आणि एक गट सत्तेबाहेर असल्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर परिस्थिती बघून राजकारण फिरवण्यासाठी पवारांना वाट मोकळी झाली… म्हणजेच काय तर भाजप पुन्हा सत्तेत आली तर तुतारीला पुन्हा राष्ट्रवादीकडे शिफ्ट करायचं आणि जर उलट झालं तर इंडिया आघाडीमध्ये शरद पवार फ्रंटला आहेच. अशा दोन्ही वाटा शरद पवारांनी खुल्या ठेवून खूप मोठा डाव साधल्याचंही बोलतात. शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा आपल्याही पक्षात फोडाफोडी होणार याचा सुगावा पवारांना अर्थात लागलेला असावा…महाराष्ट्र बाहेरच्या प्रादेशिक पक्षांची भाजपनं केलेली व्यवस्था पाहता राष्ट्रवादीला काही केल्या संपवायचं नाही, म्हणूनच एका गटाला सत्तेत आणि दुसऱ्याला सत्तेबाहेर ठेवून पवारांनी राष्ट्रवादीचं राजकारण जिवंत ठेवलंय… आणि या सगळ्या राजकारणाचा दुसरा अंक सुरू होणार तो लोकसभेच्या निवडणुकीनंतर…वारं भाजपच्या विरोधात फिरलं की पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार याचे चान्सेस म्हणूनच कायम राहतात…

यातला सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो तो अजितदादांच्या इमोशनल पॉलिटिक्सचा…

राजकारणात भावनांना महत्त्व नसतं. ज्याला इमोशन कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही, तो राजकारणात फार काळ टिकत नाही. शरद पवारांनी उभी हयात राजकारणात घालवल्यानं पवार जुन्या फळीचे एक्सपिरीयन्स पॉलिटिकल नेते म्हणून ओळखले जातात… राजकारण आणि इमोशन्सचं हे गणित पक्क ठाऊक असल्यानं पवारांनी राजकारण आणि कुटुंब यांच्यातली थिन लाईन कधीच मिक्स होऊ दिलं नाही. अगदी अनेक वर्षांपासून पवार कुटुंबात वादाची ठिणगी पडली, असं बोललं गेलं. पण घरातला हा वाद पवारांनी कधीच चव्हाट्यावर येऊन दिला नाही. अगदी अजितदादांनी पहाटेचं बंड केलं त्याचा कित्ता नंतर कुठे गिरवला नाही की अगदी काल परवा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हं जाऊन सुद्धा शरद पवार थोडे सुद्धा डगमगळले नाहीत ना ते इमोशनल झाले… याउलट परिस्थितीवर वाट काढण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. आहे तो डॅमेज कसा कंट्रोल करता येईल? पक्ष संघटना नव्याने कशी बांधता येईल? याकडे ते लक्ष देतायत…

याउलट अजितदादा हे भावनिक नेते म्हणून ओळखले जातात… जे काही वाटलं ते तडकाफडकी करून टाकलं, असा त्यांचा स्वभाव राहिला…पत्रकार परिषदांपासून ते विधानभवनातही नेत्यांना खळखळून हसवण्यापासून ते त्यांच्या छातीत धडकी भरेपर्यंत झापायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत…अनेक प्रसंगांमध्ये त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचंही पाहायला मिळालं… थोडक्यात अजितदादा हे शरद पवारांपेक्षा सेंसिटिव्ह राजकारणी आहेत… कदाचित राष्ट्रवादीत घडवून आणलेली फुट ही त्यांच्यासाठी राजकीय अपरिहार्यता असू शकते…पण भविष्यात पुन्हा एक होण्याची संधी मिळाली किंवा शरद पवारांकडून भावनिक साद घालण्यात आली तर त्यालाही अजितदादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देण्याचे चान्सेस जास्त आहेत…म्हणजेच जरी देखील पवार कुटुंबात पडलेली ही फुट खरोखरी असून हा सगळा बनाव नसल्याची सध्याची परिस्थिती आपण आहे अशी जरी एक्सेप्ट केली तरीदेखील शरद पवार आणि अजित दादा एकत्र पाहायला मिळतील…

शेवटी राष्ट्रवादीतल्या या घडामोडीला एका लिमिटपर्यंत पॉलिटिकल ड्रामा, राजकीय नाट्य म्हणता येऊ शकतं…तसं नसेल तरीदेखील शरद पवारांनी भावनिक साद घातली तरीदेखील राष्ट्रवादी पुन्हा आधीच्या स्थितीत आपल्याला बघायला मिळू शकते. एकूणच भल्याभल्यांचं राजकारण संपवणाऱ्या आणि अनेकांना राजकारणात उभारी देणाऱ्या या काका पुतण्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसू शकते, असं बोललं तरी ती नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही…