हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड मध्ये भाजप NDPP सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं. महाराष्ट्रात भाजपविरोधी महाविकास आघाडी असतानाच राष्ट्र्रवादीने नागालँड मध्ये पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. विरोधकांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा सुद्धा साधला होता. अखेर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँड सरकारला पाठिंबा देण्याचं खरं कारण सांगितलं आहे.
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, नागालँड मध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला नाही. नागालँड मध्ये आजपर्यंत कोणताही पक्ष सत्तेबाहेर राहिला नाही. सर्वजण एकत्र आले. नागालँड येथे नागांचेव विषय आहेत. एक काळ तर असा होता कि नागा संघटना देशविघातक कृत्य करत होते. त्यामुळे सगळ्यांना एकत्र आणून अशा गोष्टी टाळाव्या असा विचार तेथील मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांच्या आवाहनानंतर सर्वांना सोबत राहण्याचा विचार केला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, त्यावेळी खरं तर आमच्या ७ आमदारांनी सांगितलं होत की आम्ही भाजप बरोबर जाणार नाही. मात्र इतर ऐक्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या कडून काही पाऊल टाकली जात असतात तेव्हा आम्ही निगेटिव्ह विचार न करता आमचं सरकारला सहकार्य राहील असं आमदारांनी सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली.