हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. स्वपक्षीय लोकांनीच शिंदे यांचा पराभव घडवून आणला अशी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच साताऱ्यात आले असून शशिकांत शिंदे यांच्या सोबत गुप्त बैठक घेतली आहे.
शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरला होता. ज्ञानदेव रांजणे हे मूळचे शिवेंद्र राजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एक मताने पराभव केला होता. हा पराभव शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारीं लागला. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली. दरम्यान, नेमकं एकूण परिस्थितीवर आता शरद पवार कसा मार्ग काढणार याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे हे शरद पवार साहेबांना माहीत आहे. एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन. त्यामुळं कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची भूमिका घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांमुळंच माझी राजकीय ओळख आहे. कालच्या निवडणुकीत स्वत: शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी माझ्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही गोष्टी वेगळ्या घडल्या. आम्ही गाफील राहिलो, त्याचा फटका बसला,’ असं शिंदे यांनी पराभवानंतर म्हंटल.