हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 2019 नंतर शिवसेना आणि भाजप मधील अंतर कस वाढलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याचा फायदा कसा झाला हे पवारांनी आपल्या पुस्तकात सांगितलं आहे. शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच राजकीय हिशोब भाजपचा होता, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कोणताही स्नेहभाव नाही असं पवारांनी म्हंटल आहे. याबाबतचे वृत्त TV 9 मराठीने दिले आहे.
शिवसेनेला संपवल्याशिवाय भाजप वाढणार नाही. हाच हिशोब होता. स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचं ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती. विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019 नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता.
नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम भाजपने केलं. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले बंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या मनात शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती.
शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागांतून तिचं उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही असा भाजपचा राजकीय हिशेब होता. भाजप आपल्या अस्तित्वावर उठला आहे असा तीव्र संताप शिवसेनेत होता. परंतु सत्तेत एकत्र असल्यामुळं त्याचा उद्रेक झाला नाही. मात्र यावरून आग धुमसत होती असा दावा शरद पवारांनी केला. तसेच भाजप- शिवसेना यांच्यातील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते असेही पवारांनी म्हंटल.