दहिवडी | माणच्या जयकुमार गोरेंनी मला माढा मतदार संघातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा,’ असा आदेश पवार यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत दिला होता. तसेच मतदारसंघातील 22 नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते, असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर केला आहे.
दिवड येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि तालुक्यातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत आदी उपस्थित होते.
जयकुमार गोरे पुढे म्हणाले, बारामती, फलटण, कराड, साताऱ्यातून माझ्यावर राष्ट्रवादीकडून मिसाईलचा मारा केला जातो; पण माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकमी मिसाईल आहे. पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्याविरोधात लढली. पैशांचा पूर आणि जातीपातीचे राजकारण केले; पण जयकुमारने त्यांना हिसका दाखवला. मला पाडायची संधी हुकल्याने आता पुढील 15 वर्षे ‘त्यांनी’ आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत, असा टोलाही आमदार गोरेंनी राष्ट्रवादीला लगावलाय.