सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना चार्ज करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार येत्या रविवारी (ता.31) साताऱ्यात येत आहेत. कार्यकर्त्यांचा मेळावा हे निमित्त असणार असून लक्ष्य सातारा जिल्हा बॅंक असणार आहे. या मेळाव्याचे निमित्ताने शरद पवार हे राष्ट्रवादीच्या ताब्यात सातारा जिल्हा बॅंक कशी ठेवता येईल हेच लक्ष्य असणार आहे. तसेच या दाैऱ्यामुळे सातारा जिल्हा बॅंक बिनविरोध होणार का याकडेही आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहणारआहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या आगामी पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या मेळाव्यात आढावा घेवून मार्गदर्शन करणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याकडून सांगितले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यात काही धक्के बसले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सातारा विधानसभा मतदार संघात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर कोरेगाव मतदार संघ हक्काचा व हुकमी एक्का असलेले विद्यमान विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. माण- खटाव विधासभा मतदार संघात माजी आयुक्त व शरद पवार यांचे विश्वासू प्रभाकर देशमुख यांनाही थोड्याशा मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. तर कराड दक्षिणेत राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी झाले असून काॅंग्रेस व भाजपा याचा दबदबा दिसून येत आहे. अशातच काही दिवसावर कराड नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांचे गट एकत्र आल्याने कराड नगरपालिकेसह दक्षिणेत ताकद वाढल्याची पहायला मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची घडी बसविण्यासाठी हा दाैरा महत्वाचा मानला जात आहे. आगामी काळात होणाऱ्या पालिका, नगरपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेसह सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील पॅनेलचा तिढा सोडविण्यासाठी शरद पवार येत्या रविवारी साताऱ्यात येत आहेत. सकाळी नऊ वाजता त्यांचे साताऱ्यात विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदारांसोबत बैठक घेऊन चर्चा करतील. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या वेळी शरद पवार आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविणार आहेत. मात्र यामध्ये प्रामुख्याने लक्ष्य हे जिल्हा बॅंकच असणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दाैऱ्यादिवशी अंतिम राष्ट्रवादी व सर्वसमावेशक उमेदवारांची यादी ठरणार हेही निश्चित आहे. त्यामुळे कोण जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार यांचा फाैसला होईल. तसेच अनेकजण बिनविरोध होतील अशी आशाही अनेकांना आहे.
छ. उदयनराजे आणि अॅड. उदयसिंह पाटील केंद्रस्थानी
शरद पवार यांच्या दाैऱ्यात छ. उदयनराजे भोसले, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना बिनविरोध करायचे कि विरोध करायचा हा विषय प्रामुख्याने केंद्रस्थानी असणार आहे. छ. उदयनराजे भोसले व अॅड. उदयसिंह पाटील यांच्याबाबत निर्णय हा जिल्हा बॅंकेच्या निवडणकीचा मुद्दा या दाैऱ्यात चांगलाच गाजणार. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. कराड सोसायटी गटावर आजपर्यंत उंडाळकर गटाने वर्चस्व ठेवले आहे. अशावेळी शरद पवार काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.