Tuesday, June 6, 2023

‘रयत’मध्ये जूनपासून सुरु होणार ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम : शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होतील. ऑक्सफर्ड हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ असून तेथे प्रशिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेतील काही निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. लवकरच हा कोर्स रयत शिक्षण संस्थेत सुरु करणार आहोत. त्यामुळे येत्या जूनपासून रयतच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी म्हंटले.

कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, अॅड. रवींद्र पवार, डॉ. भगीरथ शिंदे, प्रभाकर देशमुख, राजेंद्र फाळके, सुभाष शिंदे, एम. बी. शेख, संजीव पाटील, राजकुमार पाटील, प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.

पवार म्हणाले की, आपल्याला आता काळाची पावले ओळखून बदल केले पाहिजेत. कारण रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. आता शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह त्याच्या विस्ताराकडे रयतने विशेष लक्ष दिल्याने जागतिक पातळीवरही रयतची मोहर उमटली जाणार आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. धान्य पैसा रयतेच्या नावाने उभा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यास हातभार लागला.

यावेळी अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, खासदार श्रीनिवास पाटील यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. कोमल कुंदप व प्रा. डॉ. प्राजक्ता निकम यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य जे. डी. शिर्के यांनी आभार मानले.