हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले होते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली असा थेट आरोपच बंडखोरांनी केला. आत्ता खुद्द उद्धव ठाकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी भाजपकडे बोट दाखवलं आहे , तसेच बंडखोर आमदारांना फक्त कारणे हवीत असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या सामनातील मुलाखतीचा भाग २ नुकताच प्रदर्शित झाला, यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. फुटिरांचा असाही एक आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली असा सवाल संजय राऊत यांनी केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे, तेव्हा भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा याचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारल्या म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेम तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना फटकारले.
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रिपद मिळवले. आता तर ते स्वतःची तुलना शिवसेनाप्रमुखांबरोबर करायला लागले आणि ही आमचीच शिवसेना म्हणत आहेत हा अत्यंत घाणेरडाआणि दळभद्री प्रकार आहे. उद्या ते नरेंद्र भाईशी स्वताची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. असा टोला त्यांनी लगावला. मी पण अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल का ? असा सवाल संजय राऊतांनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचाच आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.