वंचितला 4-5 जागा, जानकरही सोबतीला? शरद पवारांचा मास्टरप्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असतानाही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा एकीकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा करत असताना दुसरीकडे अशी काही विधाने करत आहेत कि महाविकास आघाडी मध्ये त्यांचा समावेश होईल कि नाही असा प्रश्न निर्माण होतोय. जागावाटपाचं घोड अजून अडलेले असताना आता महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांनी वंचित बहुजन आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. वंचितला आम्ही ५-६ जागा देऊ शकतो असं पवारांनी म्हंटल आहे. त्यामुळे आता वंचितच्या भूमिकेकडे लक्ष्य राहील आहे.

शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी वंचितला किती जागा देणार याबाबतची माहिती दिली. वंचित सोबत आल्यास त्यांना चार ते पाच जागा देणं शक्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. या ४-५ जागा नेमक्या कोणत्या असतील याबाबत माहिती समोर आली नाही. परंतु आता पवारांचा हा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर मान्य करतात का? कि पुन्हा नव्याने काहीतरी विधाने करत महाविकास आघाडीलाच इशारा देतात हे आता पाहावं लागेल. कारण यापूर्वीच महाविकास आघाडीसोबत आमचं जुळलं नाही तर राज्यात भाजप विरुद्ध वंचित अशी लढत होईल असं म्हणत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळ उडवून दिली आहे.

जानकरांसाठी पवार माढ्याची जागा सोडणार?

याच अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) आमच्यासोबत आले तर त्यांना माढाची जागा सोडली जाऊ शकते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असून राज्यात काही ठिकाणी त्यांची राजकीय ताकद सुद्धा आहे. ज्या बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत त्या बारामतीत सुद्धा धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशावेळी माढ्याची जागा जानकर यांच्यासाठी सोडून बारामतीत जानकरांच्या मदतीने सुप्रिया सुळेंना निवडून आणण्याचा प्लॅन पवारांचा असू शकतो. परंतु महादेव जानकर पवारांसोबत जाणार का? हा खरा प्रश्न आहे.